जबलपूर : भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री विजय शाह यांच्यावर अखेर बुधवारी रात्री इंदूरच्या महू मानपुर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. शाह यांनी अतिशय गलिच्छ भाषेत वक्तव्य केल्याचे सांगून त्यांना उच्च न्यायालयाने फटकारले होते. चार तासांत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा असे आदेश न्यायालयाने दिले होते.
कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. इंदूरजवळील रामकुंडा गावातील सभेत विजय शाह यांनी सोमवारी वादग्रस्त विधाने केली. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन त्यांच्यावर बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशाचे पालन न झाल्यास उद्या, गुरुवारी अवमानाच्या कारवाईचा विचार करू, अशी तंबीही न्यायालयाने पोलिसांना दिली होती.
काँग्रेसची निदर्शने, पुतळा जाळला
काँग्रेस पक्षाने बुधवारी मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्या विरोधात इंदूरमध्ये तीव्र आंदोलन केले. इंदूर येथील रिगल चौकात काँग्रेस महिला मोर्चाने केलेल्या निदर्शनांत विजय शाह यांचा पुतळा जाळण्यात आला.
मी दहा वेळा माफी मागायला तयार : शाह
मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह म्हणाले की, माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मला बहिणीपेक्षा अधिक आदर वाटतो.
विजय शाह एक मूर्ख व्यक्ती : नक्वी
विजय शाह हे मूर्ख आहेत. तसेच शाह यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी बुधवारी दिली. (वृत्तसंस्था)