अर्थमंत्री अरुण जेटलींनी केले रेल्वे भाडेवाढीचे समर्थन
By Admin | Updated: June 21, 2014 17:12 IST2014-06-21T17:12:13+5:302014-06-21T17:12:13+5:30
रेल्वे प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक दिल्याने चारही बाजूंनी मोदी सरकारवर टीका होत असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे भाडेवाढीचे समर्थन केले आहे.

अर्थमंत्री अरुण जेटलींनी केले रेल्वे भाडेवाढीचे समर्थन
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१- रेल्वे प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक दिल्याने चारही बाजूंनी मोदी सरकारवर टीका होत असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे भाडेवाढीचे समर्थन केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी भाडेवाढीसारखा कठोर पण अत्यंत आवश्यक असलेला निर्णय घेतल्याचे अरुण जेटलींनी म्हटले आहे.
रेल्वेची वाढती वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात तब्बल १४. २ टक्के तर मालवाहतूक भाड्यात ६.५ टक्क्यांनी वाढ केली होती. या भाडेवाढीवरुन देशभरातून संताप व्यक्त होत असून केंद्र सरकारविरोधात विविध राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरुन निदर्शनेही केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र या भाडेवाढीचे समर्थन केले आहे. फेसबुकवर अरुण जेटलींनी भाडेवाढीविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे. 'गेली काही वर्ष रेल्वे तोट्यात धावत होती. आता हे नुकसान भरुन काढणे गरजेचे असून प्रवाशांनी त्यांना मिळणा-या सुविधेनुसार पैसे मोजणे गरजेचे आहे. रेल्वेमंत्र्यांनी घेतलेला भाडेवाढीचा निर्णय योग्यच आहे' अशा शब्दात त्यांनी भाडेवाढीचे समर्थन केले. यूपीए सरकारच्या कारकिर्दीतच हा निर्णय घेण्यात आला होता. आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी केली आहे. आता प्रवाशांनीच ठरवावे की त्यांना रेल्वेत जागतिकदर्जाचा सुविधा हव्यात की नको असेही जेटलींनी म्हटले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या भाडेवाढीची समर्थन केले आहे.
दरम्यान, या भाडेवाढीविरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे. समाजवादी पक्षाने लखनौत तर काँग्रेसने दिल्लीत या भाडेवाढीविरोधात निदर्शने केली. काही ठिकाणी मोदी सरकारच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. मुंबई, ठाणे, घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी रेल्वेवाढीविरोधात धरणेआंदोलन केले. मुंबईतील लोकल सेवेचे मासिक पास दुप्पटीने वाढणार आहे. मुंबईतील डबेवाल्यांनी व प्रवासी संघटनेनेही याला विरोध दर्शवला आहे. रेल्वे व डबेवाले यांचे अतूट नाते आहे. मासिक पास वाढल्याने याचा फटका डबेवाल्यांसह प्रवाशांनाही बसेल. ऐरवी वारंवार ट्रॅक आणि रस्त्यावर उतरणारे भाजप खासदार किरीट सोमेय्या आता मुंबईकरांसाठी आवाज का उठवत नाही असा सवाल डबेवाल्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईसह देशभरातील प्रवासी संघटनांनी याचा कडाडून विरोध केला आहे.