लोकसभेत वित्त विधेयकाला ३५ दुरुस्त्यांसह मंजुरी; सरकारवर नाराज विरोधकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:26 IST2025-03-26T13:25:41+5:302025-03-26T13:26:00+5:30

राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर याची प्रक्रिया पूर्ण होईल

Finance Bill approved in Lok Sabha with 35 amendments; Opposition shouts slogans against government | लोकसभेत वित्त विधेयकाला ३५ दुरुस्त्यांसह मंजुरी; सरकारवर नाराज विरोधकांची घोषणाबाजी

लोकसभेत वित्त विधेयकाला ३५ दुरुस्त्यांसह मंजुरी; सरकारवर नाराज विरोधकांची घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभेने मंगळवारी वित्त विधेयक २०२५ला ३५ सरकारी दुरुस्त्यांसह मंजुरी दिली. यात ऑनलाइन जाहिरातींवर सहा टक्के डिजिटल कर समाप्त करण्याचीही तरतूद आहे. वित्त विधेयक पारित होण्याबरोबरच लोकसभेने अर्थसंकल्पीय प्रक्रियेतील आपले कार्य पूर्ण केले. राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर याची प्रक्रिया पूर्ण होईल.

केंद्रीय अर्थसंकल्पात ५०.६५ लाख कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे. ही सध्याच्या वित्त वर्षापेक्षा ७.४ टक्के जास्त आहे. 
तामिळनाडूला उत्तर प्रदेशपेक्षा जास्त मनरेगाचा निधी देण्यात आला. उत्तरेकडील या राज्याची लोकसंख्या २० कोटी असताना व तामिळनाडूची लोकसंख्या सात कोटी असतानाही हा जास्तीचा निधी दिला, असे केंद्रीय मंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.

मागील दशकात भारत आपत्ती व्यवस्थापनात जागतिक ताकद: अमित  शहा

आपत्ती व्यवस्थापनासाठी आर्थिक सहायता देण्यात काही राज्यांबरोबर भेदभाव झाल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावला. मागील दशकात भारत या क्षेत्रात जागतिक ताकद म्हणून पुढे आला आहे व जगानेही हे स्वीकारले आहे, असे ते म्हणाले.

विरोधकांची घोषणाबाजी

सरकारच्या उत्तराने नाराज होऊन द्रमुक व तृणमूल काँग्रेसचे खासदार वेलमध्ये उतरले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे राजकारण करू नये, असे आवाहन केले. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

रिजीजू यांच्याविरुद्ध नोटीस

लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद माणिकम टागोर यांनी संसदीय कामकाज मंत्री किरन रिजीजू यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस बजावली.

दूध उत्पादनात अव्वल

भारत दूध उत्पादनात जगातील अव्वल देश आहे. भारतात सध्या २३.९ लाख मेट्रिक टन दूध उत्पादन होत असून, पुढील पाच वर्षांत ते ३० लाख मेट्रिक टन करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केल्याची माहिती केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. 

Web Title: Finance Bill approved in Lok Sabha with 35 amendments; Opposition shouts slogans against government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.