अखेर उस्तादांची हरवलेली ‘सखी’ सापडली
By Admin | Updated: July 2, 2014 03:13 IST2014-07-02T03:13:28+5:302014-07-02T03:13:28+5:30
आपल्या लाडक्या सखीच्या गहाळ होण्याने प्रचंड अस्वस्थ झालेल्या उस्ताद अमजद अली खान यांच्यासह अवघ्या देशाचा जीव अखेर भांड्यात पडला

अखेर उस्तादांची हरवलेली ‘सखी’ सापडली
नवी दिल्ली : आपल्या लाडक्या सखीच्या गहाळ होण्याने प्रचंड अस्वस्थ झालेल्या उस्ताद अमजद अली खान यांच्यासह अवघ्या देशाचा जीव अखेर भांड्यात पडला. ब्रिटिश एअरवेजने त्यांचे ४५ वर्षांचे सोबती असलेले सरोद सुखरूप असल्याचे कळविले आहे. शनिवारी रात्री लंडनहून दिल्लीला येताना त्यांचे हे खास सरोद काही काळासाठी गहाळ झाले होते. आपण या सरोदद्वारे संवाद साधत असतो अशा शब्दात अमजद अली खान यांनी या वाद्यासोबत आपले जुळलेले नाते सांगितले होते.
पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त उत्साद खान यांनी मंगळवारी टिष्ट्वटरवर याची माहिती दिली. ब्रिटिश एअरवेजने आपले सरोद आपणास परत करून हरविलेल्यासोबत भेट घडवून आणली. ब्रिटिश एअरवेजने माझे सरोद मला परत केले आहे. आपण दाखविलेल्या प्रेम व आत्मियतेबद्दल धन्यवाद असेही खान यांनी टष्ट्वीटरवर नमूद केले आहे.
अमजद अली खान आपली पत्नी सुब्बालक्ष्मी यांच्यासोबत डार्टिंगटनमध्ये कार्यक्रमासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात २८ जून रोजी दिल्लीत उतरल्यानंतर सामानात आपले सरोद नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते शोधण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्याने उस्ताद काहीसे खिन्नही झाले होते. त्यांनी आपली खिन्नता प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर व्यक्त केली. सरोदच्या प्रतीक्षेत असलेल्या अमजद अली खान यांनी, एवढी मोठी विमानकंपनी अशी बेजबाबदार वर्तन कसे करू शकते, असा प्रश्नही उपस्थित केला होता.