अखेर जवानांना मिळणार मेडल, सरकार विकत घेणार 7.60 लाख मेडल्स
By Admin | Updated: April 5, 2017 09:12 IST2017-04-05T09:12:55+5:302017-04-05T09:12:55+5:30
सैन्यदलांना आधुनिक बनवण्यासाठी लढाऊ विमाने, पाणबुडया, मशीनगन्स आणि तोफा खरेदी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. पण त्याचवेळी सरकारी उदासीनतेमुळे जवानांसाठी...

अखेर जवानांना मिळणार मेडल, सरकार विकत घेणार 7.60 लाख मेडल्स
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सैन्यदलांना आधुनिक बनवण्यासाठी लढाऊ विमाने, पाणबुडया, मशीनगन्स आणि तोफा खरेदी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. पण त्याचवेळी सरकारी उदासीनतेमुळे जवानांसाठी अभिमान, गौरवाची बाब असणा-या मेडल्स खरेदीकडे दुर्लक्ष झाले होते. युनिफॉर्म अंगात चढवल्यानंतर त्यावर लावण्यात येणारे मेडल कुठल्याही जवानांसाठी अभिमानाची बाब असते.
मेडल म्हणजे रणभूमीवर गाजवलेल्या शौर्याचे प्रतिक असते. पण मेडल्सच्या कमतरतेमुळे मेडल जाहीर होऊनही मिळत नसल्याने जवानांना बाजारातून मेडल्सच्या प्रतिकृती विकत घेऊन युनिफॉर्मवर लावाव्या लागत होत्या. सरकारने आता बॅलेस्टीक हेलमेट, बुलेट प्रूफ जॅकेटबरोबर लष्करासाठी 7.60 लाख मेडल्स विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मागच्यावर्षी 16.82 लाख सेवा पदकांची कमतरता होती. लष्कर, नौदल आणि वायूदलातील जवानांना पदके जाहीर झाली पण त्यांना ती प्रदान करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे लष्करातील जवानांना खासगी दुकानांमधून मेडल्सच्या प्रतिकृती विकत घेऊन युनिफॉर्मवर लावाव्या लागत होत्या. सरकारने आता मेडल्सचा दुष्काळ संपवण्यासाठी 7.60 लाख आणि 9.89 लाख मेडल्स विकत घेण्याचे दोन प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्यापैकी 7.60 लाख मेडल्सच्या खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी 28 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.