भोपाळ : बनावट डिग्री घेतलेल्या एका भामट्याने मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका मिशनरी हॉस्पिटलमध्ये चक्क हृदयरोगतज्ज्ञ म्हणून काम केले. मात्र, त्याने ज्याच्यावर उपचार केले, त्यातील सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर संबंधित भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे एक पथक दमोह येथे पोहोचले आहे.
आरोपी डॉ. नरेंद्र जॉन कॅम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम याने नोंदणी न करता रुग्णांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली. तक्रारीनुसार, ‘डॉ कॅम’ नावाचा वापर करून स्वत:ला परदेशी शिक्षित आणि प्रशिक्षित असल्याचे दाखवले होते. या व्यक्तीचे खरे नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्याने ब्रिटनचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ प्रोफेसर जॉन कॅम यांच्या नावाचा गैरवापर करून रुग्णांची दिशाभूल केली आणि त्याच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हे मिशनरी रुग्णालय प्रधानमंत्री आयुष्मान योजनेंतर्गत येते, त्यामुळे सरकारी निधीचाही गैरवापर करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)