FIITJEE ने पैसे घेतले अन् अचानक सेंटरना टाळे ठोकले; इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणारे विद्यार्थी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:52 IST2025-01-24T18:51:39+5:302025-01-24T18:52:40+5:30
इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठीच्या तयारीसाठी FIITJEE ही प्रमुख कोचिंग संस्था होती. या सेंटरची फी देखील इतर कोचिंग सेंटरपेक्षा खूप जास्त आहे.

FIITJEE ने पैसे घेतले अन् अचानक सेंटरना टाळे ठोकले; इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणारे विद्यार्थी अडचणीत
इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी प्रसिद्ध असलेली ट्युशन संस्था फिटजी (FIITJEE) च्या अनेक केंद्रांना अचानक टाळे लागले आहे. एकेक करून ही सेंटर बंद केली जात आहेत. नोएडा सेक्टर ६३ मधील फिटजी सेंटर असेच बंद करण्यात आले आहे. यामुळे लाखोंची फी मोजून काहीही न सांगता कोचिंग क्लास बंद केल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गात खळबळ उडाली आहे.
या केंद्रात पैसे भरलेल्या पालकांना २३ जानेवारीच्या सायंकाळी सहा वाजता हे सेंटर बंद करत असल्याचे मेसेज पाठविण्यात आले. ही माहिती मिळताच पालकांनी या सेंटरकडे धाव घेतली. परंतू, तिथे आधीच टाळे लावण्यात आले होते. तसेच कोणताही कर्मचारी तिथे नव्हता.
इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठीच्या तयारीसाठी FIITJEE ही प्रमुख कोचिंग संस्था होती. या सेंटरची फी देखील इतर कोचिंग सेंटरपेक्षा खूप जास्त आहे. काही पालकांनी पाच-पाच लाखांची फी भरली आहे. तर काहींनी सात लाख रुपयेही भरले आहेत. आता हे पालक सेंटरबाहेर कागदपत्रे घेऊन उभे आहेत.
मुलांच्या भविष्यासाठी काही पालक मोठे निर्णय घेत आहेत. काहींनी आपल्या मुलांना दुसऱ्या कोचिंगला पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. आता ना पैसे मिळणार ना शिक्षणाची काही अपेक्षा आहे, असे या पालकांचे म्हणणे आहे. तसेच आजतकने मालकांना फोन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे फोनही बंद येत आहेत.