उत्तर प्रदेशमध्ये जमिनीच्या वादातून एका व्यक्तीचा मृतदेह दोन दिवस अंत्यसंस्काराविना पडून राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कुटुंबातील जमिनीची वाटणी करण्यात आली आणि मुलीने वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हे प्रकरण कोतवाली परिसरातील औरेखी गावातील आहे.
सुरेश कुमार (वय ५२) यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांची मुलगी शिल्पीला वडिलांच्या मृत्यूवर संशय आल्याने तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरेश कुमार यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या वडील माता प्रसाद यांच्या नावावर ११ बिघा जमीन होती. सुरेश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने जमिनीच्या वाटणीची मागणी धरली. त्यामुळे दोन दिवस मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. सोमवारी दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर, सुरेशचे वडील माता प्रसाद यांनी जमीन त्यांचा दोन मुलांत वाटून दिली.
पोलीस आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सोमवारी संध्याकाळी अखेर हा वाद मिटला. त्यानंतर मुलगी शिल्पीनेच वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, शिल्पीने ट्विटरवर एक पोस्ट करून तिच्या वडिलांच्या मृत्यूसाठी आजोबा आणि काकांना जबाबदार धरले. पोलीस निरीक्षक अजय ब्रह्मा तिवारी यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.