मुलाच्या शाळेमध्ये गेलेल्या वडिलांचा एका अर्जावर सही करत असताना तिथेच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे. अतर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरवा येथील रहिवासी सुरेश हे मुलाच्या शाळेतील एका अर्जावर सही करण्यासाठी नवोदय शाळेत आले होते. याचदरम्यान, त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना घाम आला आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात गोंधळ उडाला.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शाळेतील कर्मचाऱ्यांनी सुरेश यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तसेच पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. मटौंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसओ संदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये हा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे दिसत आहे. मात्र पोस्टमार्टेमच्या अहवालानंतरचं मृत्यूमागचं नेमकं कारण समजणार आहे.
या घटनेनंतर मृत सुरेश यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मुलाच्या शाळेत किरकोळ कामासाठी गेलेल्या सुरेश यांचा असा अकाली मृत्यू होईल, यावर कुटुंबीयांचा विश्वास बसत नाही आहे. तसेच या घटनेमुळे स्थानिकांना आणि शाळेच्या प्रशासनाला धक्का बसला आहे.