लेकीच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी टॉवरवर चढले वडील; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 17:49 IST2023-09-12T17:43:49+5:302023-09-12T17:49:07+5:30
सात वर्षीय मुलीची शाळेत तब्येत बिघडली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. वडिलांना मृत्यूचं कारण जाणून घ्यायचं आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशच्या सीहोरमध्ये एका वडिलांनी पोलीस प्रशासनाकडून आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूमागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी आणि तिला न्याय देण्यासाठी वडील टॉवरवर चढले. जवळपास सहा तास ते टॉवरवर चढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनाच्या एका टीमने आश्वासन दिल्यानंतर ते टॉवरवरून खाली उतरले.
टॉवरवर चढलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्याची सात वर्षांची मुलगी शाळेत गेली होती. तिथे अचानक तिची तब्येत बिघडली, उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर मुलीला शाळेतून घरी पाठवण्यात आलं. मुलीची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम न केल्याने मृत्यूचं कारण समोर आलं नाही.
मुकेश मेवाडा असं या व्यक्तीचं नाव असून त्यांच्या सात वर्षीय मुलीची शाळेत तब्येत बिघडली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. वडिलांना मृत्यूचं कारण जाणून घ्यायचं आहे. पोलिसांनी याबाबत काहीच सांगितलं नाही. त्यामुळे मुकेश रात्री दोन वाजता टॉवरवर चढले आणि सकाळी पोलिसांनी जेव्हा दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं तेव्हा खाली उतरले.
जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर गौरव ताम्रकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलीला रुग्णालयात आणलं तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. इन्फेक्शन सर्वत्र पसरलं होतं. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी कलेक्टर प्रवीण सिंह यांनी मुलीच्या मृत्यूची चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.