इस्लाममधील अनिष्ट प्रथांवर आणि धर्मासंदर्भात भाष्य करणारे यूट्यूबर सलीम वास्तिक यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला झाला. गाझियाबादमधील लोनी परिसरातील त्यांच्या कार्यालयात शिरून दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा गळा चिरला आणि पोटात चाकू खुपसून फरार झाले. वास्तिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
कार्यालयात शिरून केला हल्ला - ५० वर्षीय सलीम वास्तिक हे लोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अली गार्डन कॉलनीमध्ये राहतात. ते 'सलीम वास्तिक 0007' या नावाने युट्यूब चॅनेल चालवतात. या चॅनेलच्या माध्यमातून ते इस्लामिक अनिष्ट प्रथांसंदर्भात व्हिडिओ पोस्ट करत असत, यामुळे काही जण त्यांच्यावर नाराज होते. शुक्रवारी सकाळी सलीम आपल्या कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
हेल्मेट घालून आले होते दोन हल्लेखोर -प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर सलीम यांच्या कार्यालयात शिरले. त्यांनी हेल्मेट घातलेले होते. त्यांनी अचानक सलीम यांच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार केला. घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या सलीम यांना तत्काळ जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
सीसीटीव्हीच्या माध्यमाने तपास सुरू -या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सलीम यांच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. सलीम यांच्यावरील हल्ल्यानंतर, पत्नी अफसाना आणि मुलगा उस्मान प्रचंड रडत आहेत. लोनीचे एसीपी सिद्धार्थ गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमीवर उपचार सुरू असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.