शेतकऱ्यांचा १६ ला ट्रॅक्टर मोर्चा, १८ रोजी रेल रोको; आंदोलकांना शंभू सीमेवर रोखून धरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 12:09 IST2024-12-15T12:09:14+5:302024-12-15T12:09:27+5:30
पंजाबमध्ये १८ डिसेंबर रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी जाहीर केले.

शेतकऱ्यांचा १६ ला ट्रॅक्टर मोर्चा, १८ रोजी रेल रोको; आंदोलकांना शंभू सीमेवर रोखून धरले
पतियाळा : पंजाबला लागून असलेल्या हरयाणाच्या सीमेवर (शंभू सीमा) दिल्लीच्या दिशेने शनिवारी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला तसेच अश्रुधुराची नळकांडी फोडली. त्यानंतर शेतकऱ्यांचा दिल्ली मार्च एका दिवसासाठी थांबविण्यात आला असून १६ डिसेंबर रोजी पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. पंजाबमध्ये १८ डिसेंबर रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी जाहीर केले.
आंदोलन करणारे १०१ शेतकरी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शंभू सीमेवरून दिल्ली निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना घग्गर नदीवरील पुलावर रोखले. अश्रुधुराचा वापर व पाण्याच्या माऱ्यात १७ शेतकरी जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
शंभू सीमेजवळ एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जोध सिंग असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते लुधियानाच्या खन्ना येथील असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.