गारपीटग्रस्त शेतकर्यांचे अनुदानासाठी साकडे शेतकरी उद्ध्वस्त : पंचनामे करूनही दमडीही नाही
By Admin | Updated: July 11, 2015 00:31 IST2015-07-10T21:26:17+5:302015-07-11T00:31:23+5:30
नाशिक : सटाणा तालुक्यातील धांद्री येथे नोव्हेंबर ते मार्च पाच महिने सलग गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासकीय मदतीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने शुक्रवारी शेकडो शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात गारपिटीत प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कमच अद्याप शेतकर्यांना उपलब्ध करून दिलेली नाही.

गारपीटग्रस्त शेतकर्यांचे अनुदानासाठी साकडे शेतकरी उद्ध्वस्त : पंचनामे करूनही दमडीही नाही
नाशिक : सटाणा तालुक्यातील धांद्री येथे नोव्हेंबर ते मार्च पाच महिने सलग गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासकीय मदतीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने शुक्रवारी शेकडो शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात गारपिटीत प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कमच अद्याप शेतकर्यांना उपलब्ध करून दिलेली नाही.
या संदर्भात शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ मध्ये धांद्री व परिसरातील गावांमध्ये प्रचंड गारपीट होऊन खरिपाची पिके नष्ट झाली, तर जे काही बचावले त्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले व त्यानंतर शासनाने गारपीटग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप केले. या मदतीवर शेतकरी थोडा उभा राहिला व पुन्हा त्याने पिके घेण्यास सुरुवात करताच, मार्चमध्ये पुन्हा गारपीट झाली. त्यावेळी सर्व पिके हातची गेली. वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकर्यांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान सोसावे लागले. शासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्यावर पंचनामेही करण्यात आले. परंतु शासनाने ज्यांना नोव्हेंबर महिन्यात अनुदान दिले त्यांना मार्चमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ज्या शेतकर्यांचे पंचनामे झाले आहेत तसेच ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करून लगतच्या गावातील शेतकर्यांना मात्र नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली, पण आम्हाला नाही अशी तक्रारही त्यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांना निवेदन देण्यात आले, प्रसंगी गजेंद्र चव्हाण, बहिणाजी धोंडू चव्हाण, सुरेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, पोपट चव्हाण, अशोक देवरे, विश्वास चव्हाण, बाळू चव्हाण, सुदाम पवार आदि उपस्थित होते.