दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:48 IST2024-11-18T14:47:37+5:302024-11-18T14:48:00+5:30
Farmers Protest: राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहे. शेतकरी आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. तसेच मागच्या अनेक महिन्यांपासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी तिथून दिल्लीकडे प्रयाण करतील.

दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहे. शेतकरी आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. तसेच मागच्या अनेक महिन्यांपासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी तिथून दिल्लीकडे प्रयाण करतील. याबरोबरच शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी आमरण उपोषण करण्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी शेतकरी आंदोलनाबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही ९ महिने गप्प बसलो होतो. मागच्या अनेक महिन्यांपासून सरकारने आमच्यासोबत कुठलीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे आता आम्हीच दिल्लीमध्ये जाऊन सरकारसोबत चर्चा करणार आहोत. शंभू बॉर्डरवरून शेतकरी ६ डिसेंबर रोजी दिल्लीकडे कूच करतील, असेही त्यांनी सांगितले.
पंढेर यांनी पुढे सांगितले की, खनोरी बॉर्डर येथे शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवार हे २६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करतील. ज्या दिवशी डल्लेवाल हे उपोषणाला बसतील, त्या दिवसापासून आम्ही सरकारला १० दिवसांची मुदत देऊ, जर कुठलाही तोडगा निघाला नाही, कर आम्ही ६ डिसेंबर रोजी आम्ही दिल्लीकडे कूच करू.