Farmers Protest: आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न; शेतकरी नेत्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:41 IST2020-12-15T04:54:12+5:302020-12-15T06:41:49+5:30
आंदोलनाच्या १९ व्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी वाढत असल्याने केंद्र सरकारची कोंडी

Farmers Protest: आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न; शेतकरी नेत्यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घातले. सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी एक दिवसाचा उपवास केला. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सहभाग घेतला. या आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.
आंदोलनाच्या १९ व्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी वाढत असल्याने केंद्र सरकारची कोंडी होत आहे. वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या दिवसभर बैठका सुरू असून यावर विचारविमर्श करण्यात आले. दरम्यान, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, बिहार आणि हरयाणाच्या ऑल इंडिया कॉर्डिनेशन कमिटीअंतर्गत कार्यरत असलेल्या १० शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्याला समर्थन दिले.
आंदोलकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप
- चिल्ला सीमेवर शेतकऱ्यांना बसवून आंदोलकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी लोकमतला सांगितले.
- भाजपने २०० ते ३०० शेतकऱ्यांना दिल्लीतील चिल्ला सीमेवर बसवले होते. या शेतकऱ्यांचा संयुक्त किसान मोर्चाशी काही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला.