शेतकऱ्यांचा एल्गार! २९ नोव्हेंबरला १ हजार ट्रॅक्टर्स घेऊन संसदेवर कूच करणार, शेतकऱ्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 20:02 IST2021-11-09T20:02:12+5:302021-11-09T20:02:39+5:30
शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील संसद भवनाच्या दिशेनं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांचा एल्गार! २९ नोव्हेंबरला १ हजार ट्रॅक्टर्स घेऊन संसदेवर कूच करणार, शेतकऱ्यांची घोषणा
शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील संसद भवनाच्या दिशेनं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलक गाजीपूर आणि टिकरी सीमेवरुन प्रत्येकी ५०० ट्रक्टर्ससह संसद भवनाच्या दिशेनं रवाना होतील. संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) ९ सदस्यीय समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे.
सोनीपतच्या कुंडली सीमेजवळ संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत संसद भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २६ नोव्हेंबरपासून आंदोलकांच्या संख्येत वाढ करण्यात येईल आणि २९ नोव्हेंबर रोजी टिकरी व गाजीपूर सीमेवरुन आंदोलनाला सुरुवात होईल. दोन्ही सीमांवरुन प्रत्येकी ५०० असे एकूण १००० ट्रॅक्टर्स संसद भवानाच्या दिशेनं कूच करतील. याशिवाय पोलिसांकडून ज्या ठिकाणी अडवण्यात येईल त्याच ठिकाणी ठाण मांडून आंदोलन सुरू ठेवलं जाईल, असा निर्णय शेतकऱ्यांनी बैठकीत घेतला आहे.
बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडले गुरनाम सिंग चढूनी
संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीबाबत माहिती देताना शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. २९ नोव्हेंबर रोजी टिकरी आणि गाजीपूर सीमेवरुन शेतकरी ट्रॅक्टर्ससह संसद भवनाच्या दिशेनं निघतील. शेतकऱ्यांना ज्याठिकाणी पोलिसांकडून अडवलं जाईल त्याच ठिकाणी रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलन सुरु ठेवलं जाईल असं ठरविण्यात आलं. याच बैठकीत शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी मात्र नाराज होऊन बाहेर पडले. यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.