योगी आदित्यनाथांचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी शेतकऱ्याच्या पिकावर नांगर, पुढच्या महिन्यात आहे मुलीचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 15:54 IST2018-02-23T15:10:54+5:302018-02-23T15:54:36+5:30
शेतक-याचं पीक कापलं जात आहे कारण योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला उतरवण्यासाठी जागा करायची आहे

योगी आदित्यनाथांचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी शेतकऱ्याच्या पिकावर नांगर, पुढच्या महिन्यात आहे मुलीचं लग्न
लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या डझनभर मंत्र्यांसोबत दोन दिवसांच्या बरसाना दौ-यावर असणार आहेत. यावेळी ते लठमार होलीचा आणि ब्रज संस्कृतीचा आनंद घेताना दिसतील. 24 फेब्रुवारीला योगी आदित्यनाथ बरसाना येथे येणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या पार्श्वभुमीवर जोरदार तयारी सुरु आहे. योगी आदित्यनाथांचा हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी प्रशासन पुरेपूर प्रयत्न करत आहे. बरसानामधील लोकही योगी आदित्यनाथांच्या दौ-यामुळे उत्साहित आहेत. मात्र यावेळी एक शेतकरी प्रचंड दुखी आहे. योगी आदित्यनाथांच्या दौ-यामुळे या शेतकऱ्याला आपलं उभं पीक हंगामाआधीच कापावं लागलं आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतरच शेतक-याला उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला आहे.
शेतकऱ्याचं पीक कापलं जात आहे कारण योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला उतरवण्यासाठी जागा करायची आहे. या शेतकऱ्याच्या शेतातच हेलिकॉप्टर लँडिंगसाठी हेलिपॅड उभारलं जात आहे. आपल्या मेहनतीवर नांगर फिरताना पाहून शेतक-यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. हा शेतकरी लीजवर जमीन घेऊन शेती करतो. पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार, नरेंद्र कुमार भारद्वाज नावाच्या या शेतक-याने 60 हजार रुपयांच पाच एकर जमीन घेतली आहे.
नरेंद्र कुमार भारद्वाज यांच्याकडे पैसे कमावण्याचा दुसरा कोणाताही मार्ग नाही. याचवर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या मुलीचं लग्न आहे. पीक नष्ट झाल्यामुळे कमाईचा एकमेव मार्गही बंद झाला आहे. पीक कापल्यानंतर नरेंद्र कुमार भारद्वाज यांना कोणता मोबदलाही देण्यात आलेला नाही. आपण अधिका-यांशी मोबदल्याविषची चर्चा केली असता, कोणतंही योग्य उत्तर मिळालं नाही असं शेतक-याने सांगितलं आहे. आता मुख्यमंत्री मदत करतील अशी अपेक्षा त्यांना आहे.