Farmer Protest: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च; राकेश टीकैत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:48 IST2022-12-28T19:48:21+5:302022-12-28T19:48:34+5:30
बीकेयू नेते राकेश टिकैत यांनी देशभरात ट्रॅक्टर मार्च काढण्याची घोषणा केली आहे.

Farmer Protest: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च; राकेश टीकैत यांची घोषणा
Farmer Tractor March: काही महिन्यांपूर्वी देशभरात केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. अनेक महिने चाललेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारला शेतकऱ्यांसमोर हात टेकावे लागले. त्यावेळेस शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर मार्चदेखील काढला होता. तसाच ट्रॅक्टर मार्च देशभरात काढण्याची घोषणा भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.
येत्या 26 जानेवारीला देशभरात ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याची घोषणा राकेश टिकैत यांनी केली आहे. राकेश टिकैत म्हणाले की, 26 जानेवारीला हरियाणातील जिंदमध्ये मोठी पंचायत होणार असून इतर ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. टिकैत यांनी बुधवारी (28 डिसेंबर) भटिंडा येथील एका मेळाव्यात ही माहिती दिली. जीरा येथे सुरू असलेल्या दारू कारखान्याच्या व्यवस्थापकाने सुधारणा न केल्यास कारखाना बंद करण्यात येईल. याकडे राज्य सरकार व केंद्र सरकारने लक्ष न दिल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असेही राकेश टिकैत यांनी सांगितले.
केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना टिकैत म्हणाले की, सरकारने देशातील लोकांना खात्रीशीर रोजगार दिला नाही, म्हणून ते दाखवण्यासाठी अग्निवीर योजना सुरू केली आहे. केंद्र सरकार देशातील जनतेची फसवणूक करत असून, केंद्र सरकारने देशात एकही काम केले नाही. प्रत्येक वर्ग केंद्र सरकारवर नाराज असून, देशातील सर्वात लहान दुकानदारही केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात आहे, असे टीकैत म्हणाले.