Punjab Accident: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमृतसर, गुरुदासपूर, तरणतारन, कपूरथला यासह बहुतेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणांमधून पाणी सोडल्यामुळे रावी, सतलज, बियाससह सर्व नद्या आणि कालवे दुथडी भरून वाहत होते ज्यामुळे लाखो एकर जमीन आणि शेकडो गावे पाण्याखाली गेली. लोकांना त्यांची घरे सोडून त्यांच्या सामानासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. अशातच पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अंगावर भिंत कोसळल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पंजाबमधील अनेक भागात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये लोकांच्या घरांचे आणि शेतांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे लोक खूप अस्वस्थ आहेत. प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अशातच रविवारी, पावसामुळे मानसा येथे एका वीटभट्टीच्या गोदामाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत सायकलवरून प्रवास करणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. जवाहरके गावात हा अपघात घडला. मृताचे नाव ५८ वर्षीय जगजीवन सिंग असे आहे.
जगजीवन सिंग हे शेताकडे जाण्यासाठी सायकलवरुन निघाले होते. रस्त्यात स्पीडब्रेकर असल्याने त्यांनी सायकलचा वेग कमी केला. मात्र ज्याठिकाणी स्पीडब्रेकर होता त्याला लागूनच वीटभट्टीच्या गोदामाची भिंत होती. जगजीवन सिंग तिथून जात असतानाच काही कळायच्या आत त्यांच्या अंगावर संपूर्ण भिंत कोसळली. सिंग यांना वाचण्याचा एक क्षणही मिळाला नाही. ते भितींसह विटांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यानंतर सिंग यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी सिंग यांना मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, पंजाबमधील ९ जिल्हे पुरामुळे बाधित झाले आहेत. यामध्ये फाजिल्का, फिरोजपूर, कपूरथला, पठाणकोट, तरनतारन, होशियारपूर, मोगा, गुरुदासपूर आणि बर्नाला यांचा समावेश आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण १०१८ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.