बलात्काराच्या आरोपाखाली फलाहारी भोंदूबाबाला राजस्थानमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:57 IST2017-09-23T23:57:17+5:302017-09-23T23:57:40+5:30
राजस्थानातील अलवार येथील आश्रमातून फलाहारी महाराज नावाच्या एका भोंदूबाबास बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

बलात्काराच्या आरोपाखाली फलाहारी भोंदूबाबाला राजस्थानमध्ये अटक
जयपूर : राजस्थानातील अलवार येथील आश्रमातून फलाहारी महाराज नावाच्या एका भोंदूबाबास बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एका २१ वर्षीय वकील तरुणीवर न्यायाधीश बनविण्याचे आमिष दाखवून, बलात्कार केल्याचा आरोप ५८ वर्षीय फलाहारी बाबावर आहे. या आधी पोलीस अटक करायला गेले, तेव्हा तो आजारी असल्याचा बहाणा करून रुग्णालयात दाखल झाला होता. तेथून बाहेर पडताच, त्याला अटक करण्यात आली
पीडित तरुणी छत्तीगडमधील बिलासपूरची आहे. बाबाविरुद्ध तक्रार देण्यास ती घाबरत होती. तथापि, राम रहीम याला शिक्षा झाल्यानंतर तिची हिंमत वाढली आणि तिने तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर, बिलासपूर पोलीस बाबाच्या अटकेसाठी अलवारमध्ये दाखल झाले. शनिवारी बाबाच्या मुसक्या आवळण्यात आल्या, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक पारस जैन यांनी दिली. उत्तर भारतात फलाहारी बाबाचा मोठा अनुयायी वर्ग आहे. त्याचा बिलासपूरमध्येही आश्रम आहे. (वृत्तसंस्था)