खुनी आरोपीला प्रेमाने कवटाळणा-या पोलिसाची हकालपट्टी
By Admin | Updated: August 2, 2014 12:49 IST2014-08-02T11:40:07+5:302014-08-02T12:49:31+5:30
पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला प्रेमाने समजावणे पोलीस अधिका-याला चांगलेच महागात पडले असून त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे

खुनी आरोपीला प्रेमाने कवटाळणा-या पोलिसाची हकालपट्टी
ऑनलाइन टीम
कानपूर, दि. २ - पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करणा-या आरोपीला प्रेमाने समजावणे पोलीस अधिका-याला चांगलेच महागात पडले असून त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. बहुचर्चित ज्योती खून प्रकरणातील आरोपी पियुषला पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर सीओ आर.के. नायर यांनी चक्क त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. हा प्रकार कॅमेरात कैद झाला होता, आणि त्यावरून सर्व स्तरांत चर्चा सुरू झाली.
नायर यांनी पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या पियुषला जवळ बोलावून त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. तसेच आई-वडीलांना मान खाली घालायला लागले, असे कृत्य भविष्यात पुन्हा न करण्याचा सल्लाही दिला. खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीला कठोर शिक्षा करायची सोडून पोलिस त्याच्याशीच प्रेमाने वागले, हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. अखेर त्या पोलिसावर कारवाई करण्यात आली असून त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
आरोपी पियुषचे लग्नानंतरही अनैतिक संबंध सुरुच होते. मात्र त्याची कुणकुण ज्योती या त्याच्या पत्नीला लागल्याने त्याने तिची हत्या केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने आपली पत्नी बेपत्ता असल्याची खोटी तक्रारही दाखल केली होती. मात्र पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच पियूषने आपला गुन्हा कबूल केला.