फास्टटॅगद्वारे वसुलीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निर्णय बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 07:02 IST2021-01-01T00:14:57+5:302021-01-01T07:02:43+5:30
ज्या वाहनावर फास्टटॅग नसेल त्याच्या वाहनचालकाला दंड म्हणून दुप्पट प्रमाणात टोल भरावा लागणार आहे.

फास्टटॅगद्वारे वसुलीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निर्णय बदलला
नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टटॅगद्वारेच १०० टक्के वसुली व्हावी यासाठी सज्जतेकरिता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याआधी १ जानेवारीपासून टोलवसुली रोख पैशात होणार नाही असे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय)ने जाहीर केले होते. त्यामुळे गहजब माजला होता. टोलवसुली फक्त फास्टटॅगद्वारे होण्यासाठी वाहनधारक तसेच यंत्रणा अद्याप पूर्णपणे सज्ज नाही अशी टीकाही झाली होती. त्याची दखल घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एनएचएआयचा निर्णय बदलला.
देशभरात सध्या राष्ट्रीय महामार्गावर फास्टटॅगद्वारे होणाऱ्या टोलवसुलीचे प्रमाण ७५ ते ८० टक्केच आहे. टोलनाक्यांवर वाहनांनी प्रवेश करायच्या सर्व मार्गिकांचे रूपांतर आता फास्टटॅग मार्गिकांमध्ये करण्यात आले आहे. ज्या वाहनावर फास्टटॅग नसेल त्याच्या वाहनचालकाला दंड म्हणून दुप्पट प्रमाणात टोल भरावा लागणार आहे. या नियमाचा बडगा उगारल्याने फास्टटॅगद्वारे होणारी टोलवसुली लवकरच १०० टक्क्यांपर्यंत जाईल असा एनएचएआयला विश्वास आहे.