नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून कायमचे हद्दपार करा : ममता बॅनर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 06:49 IST2019-04-09T06:49:16+5:302019-04-09T06:49:32+5:30

आता जनतेनेच पंतप्रधानांच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी

Expose Narendra Modi to power and politics forever: Mamata Banerjee | नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून कायमचे हद्दपार करा : ममता बॅनर्जी

नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून कायमचे हद्दपार करा : ममता बॅनर्जी

नागराकाटा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून हद्दपार करा तसेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी, असे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी काढले.


येथील प्रचारसभेत त्या म्हणाल्या, मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील साडेचार वर्षे विदेश दौरे करण्यातच घालविले. त्यांना देशातील शेतकरी, मध्यमवर्गाकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नव्हता. निवडणुका तोंडावर आल्यानंतर मोदी आता प्रत्येकाला धमकावत आहेत आणि सर्रास खोटा प्रचार करत आहेत. धडधडीत खोटे बोलण्याच्या स्पर्धेत मोदी नक्कीच प्रथम क्रमांक पटकावतील. त्या पुढे म्हणाल्या, मोदी यांनी खोटे बोलू नये म्हणून आता जनतेनेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी. देशाच्या भल्यासाठी त्यांना केवळ पंतप्रधानपदावरूनच नव्हेतर, राजकारणातूनही हद्दपार करायला हवे.


माझ्यामुळे ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेस यांची घाबरगुंडी उडाली आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुचबिहारमधील प्रचारसभेत रविवारी केले होते. त्यासंदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न केलात, तर ती तुमची सर्वांत मोठी घोडचूक ठरेल. देशातील शेतकरी जेव्हा आत्महत्या करत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते?
नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही माणसे मरण पावली, कोट्यवधी लोकांच्या हातातील रोजगार गेला त्या वेळी मोदी काय करत होते, याचे उत्तर पंतप्रधानांनीच दिले पाहिजे. (वृत्तसंस्था)

गतिरोधक दीदी
केंद्राच्या विकास योजना पश्चिम बंगालमध्ये राबविण्यात अडथळे आणणाऱ्या ममता बॅनर्जी स्पीडब्रेकर (गतिरोधक) दीदी आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी सातत्याने करत आहेत. बॅनर्जी यांच्यामुळे या राज्यातील जनतेला केंद्रीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागते, असेही त्यांनी म्हटले होते. या उद्गारांमुळे ममता खूप संतापल्या असून त्याही मोदींवर पलटवार करत आहेत.

Web Title: Expose Narendra Modi to power and politics forever: Mamata Banerjee