सोमवारी संध्याकाळी उशिरा दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कार स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आणि डझनभराहून अधिक जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची विचारपूस केली. तर, अमित शाह यांनी घटनास्थळ धाव घेत पाहणी केली आणि रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली. सदर घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि मंगळवारी सकाळी गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कॉँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
कार स्फोटाबद्दल, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले की, "दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कार स्फोटाची बातमी अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या दुःखाच्या वेळी, मी प्रियजनांना गमावलेल्या शोकग्रस्त कुटुंबांसोबत उभा आहे आणि त्यांच्यासाठी मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमींना लवकर बरे वाटेल अशी आशा आहे."
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, "दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेली स्फोटाची घटना हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेतील दिवंगत आत्म्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या संवेदना आणि प्रार्थना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. ईश्वराकडे प्रार्थना आहे की दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि जखमींना लवकर आरोग्य प्राप्त होवो. ॐ शांती 🙏"
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिले की, "आज दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसंच, जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे. माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे कि, सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी. त्यायोगे येणारा चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो."
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिले की, "आज दिल्लीत झालेली दुर्दैवी स्फोट घटना आणि त्यामुळे झालेली मनुष्यहानी अत्यंत दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या शोकग्रस्त कुटुंबीयांबद्दल माझ्या संवेदना आहेत. प्रभू श्री राम यांच्याकडे प्रार्थना आहे की, दिवंगत आत्म्यांना सद्गती मिळो, शोकाकुल कुटुंबांना हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती मिळो आणि जखमींना त्वरित आरोग्य लाभ प्राप्त होवो."
Web Summary : A car blast near Delhi's Red Fort killed eight. Leaders including Rahul Gandhi, Sharad Pawar, Yogi Adityanath and Devendra Fadnavis expressed condolences and called for investigation. PM Modi and Amit Shah reacted to the incident.
Web Summary : दिल्ली के लाल किले के पास कार विस्फोट में आठ की मौत हो गई। राहुल गांधी, शरद पवार, योगी आदित्यनाथ और देवेंद्र फडणवीस सहित नेताओं ने संवेदना व्यक्त की और जांच की मांग की। पीएम मोदी और अमित शाह ने घटना पर प्रतिक्रिया व्यक्त की।