हिंदूसोबत लग्न केलं म्हणून चर्चने मागितलं स्पष्टीकरण
By Admin | Updated: March 18, 2016 13:18 IST2016-03-18T13:14:57+5:302016-03-18T13:18:52+5:30
हिंदू महिलेशी लग्न केल्याबद्दल चर्चने आपल्या सदस्याकडे स्पष्टीकरण मागितल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे

हिंदूसोबत लग्न केलं म्हणून चर्चने मागितलं स्पष्टीकरण
>ऑनलाइन लोकमत -
कोच्ची, दि. १८ - हिंदू महिलेशी लग्न केल्याबद्दल चर्चने आपल्या सदस्याकडे स्पष्टीकरण मागितल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. बेन्नी थोम्माना यांच्याकडून हे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. बेन्नी थोम्माना सेंट जोसेफ चर्चेचे सदस्य आहेत. 10 वर्षापुर्वी त्यांनी लिजा जयासुधन या हिंदू महिलेशी लग्न केलं होतं. बेन्नी थोम्माना आणि लिजा जयासुधन दोघेही आपापल्या धर्माच्या रुढी, परंपरांच पालन करतात.
बेन्नी यांना मार्च 2016 मध्ये जेव्हा हे पत्र मिळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. बेन्नी यांनी चर्चचे धार्मिक विधी न करता लग्न केल्याप्रकरणी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. बेन्नी यांना चर्चच्या विशेष प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर हजर होण्यास सांगण्यात आलं आहे.
विशेष विवाह कायद्याअंतर्गत 7 फेब्रुवारी 2005 मध्ये विवाहाची नोंदणी करण्यात आली आहे. मी कायद्याविरोध कोणतंही कृत्य केलेलं नाही. आम्हाला धमकावलं जात आहे. आम्हाला शांततेत आयुष्य जगायचं आहे असं बेन्नी यांनी सांगितलं आहे. न्यायाधिकरणासमोर आम्ही हजर होणार नाही. धर्मांतर करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्या धर्मांचं पालन करायचं हे आमची मुले ठरवतील असंही बेन्नी बोलले आहेत.
फादर पदायत्ती यांनी चर्च नामकरणविधी, दफनविधी आणि विवाह यांची नोंद ठेवतं असल्याचं सांगितल. न्यायाधिकरण त्यांना आध्यात्मिक कार्यासाठी बोलावत आहे. आम्ही कोणालाही धर्मातर करण्यास सांगत नाही आहोत. कुटुंबाने लग्नाची माहिती लपवली होती त्यामुळे चर्चला यासाठी इतका उशीर लागल्याचं स्पष्टीकरण फादर पदायत्ती यांनी दिलं आहे.