महाग रिचार्ज, २ सिमच्या त्रासाने ग्राहक घटले; देशात मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत २.५ टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 07:50 IST2025-09-25T07:50:03+5:302025-09-25T07:50:37+5:30
महाराष्ट्रातील मोबाइल ग्राहक झाले आणखी कमी; नेटवर्क समस्या, कॉल ड्रॉप वाढले.

महाग रिचार्ज, २ सिमच्या त्रासाने ग्राहक घटले; देशात मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत २.५ टक्के घट
नवी दिल्ली - देशातील मोबाइल वापरकर्त्यांच्या घटत्या संख्येमुळे टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील टेलिडेन्सिटी २०२१ मध्ये १०८.४५ टक्क्यांवरून २०२५ मध्ये १०३.०२ टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील टेलिडेन्सिटी ५.४३ टक्क्यांनी घटली आहे. याचे मुख्य कारण मोबाइल टॅरिफमध्ये वाढ आणि दोन सीम ठेवण्यात येणारी अडचण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी ग्राहक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी दोन सीमकार्ड वापरत असत. परंतु, आता महागडे पॅक आणि कडक नियमांमुळे त्यांनी अतिरिक्त कनेक्शन बंद केले आहे. ट्रायच्या अहवालाून ही माहिती समोर आली आहे.
टेलिडेन्सिटी म्हणजे काय?
टेलिडेन्सिटी म्हणजे प्रती १०० लोकसंख्येमागे मोबाइल कनेक्शनची संख्या. उदाहरणार्थ, राजस्थानची टेलिडेन्सिटी ८०.०३ टक्के आहे, म्हणजेच ८० टक्के लोकसंख्या दूरसंचार सेवांशी जोडलेली आहे किंवा त्यांच्याकडे इतके कनेक्शन आहेत. ग्रामीण भागात यात अधिक घट होत आहे.
कॉल ड्रॉपमुळे जनता त्रस्त : नेटवर्क समस्या, कॉल ड्रॉप वाढले; डेटा स्पीड मिळत नाही. मोबाइल ऑपरेटर्सच्या पायाभूत सुविधांमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही.
मोबाइल वापराचे प्रमाण कुठे कमी झाले?
भारतामध्ये मोबाइल वापराचे प्रमाण (टेलिडेन्सिटी) जून २०२५ मध्ये ८२.१८% होते, ते जुलै २०२५ मध्ये थोडे कमी होऊन ८२.१६% झाले.