अपेक्षांचं बॅलन्स शीट
By Admin | Updated: June 29, 2014 12:31 IST2014-06-29T11:48:17+5:302014-06-29T12:31:18+5:30
'अच्छे दिन आयेंगे' असं स्वप्न दाखवत निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांचं राजकीय कौशल्य देशानं अनुभवलं, पण आता १२१ कोटी लोकसंख्येच्या देशाला उत्सुकता आहे ती त्यांच्या आर्थिक नीतीची.

अपेक्षांचं बॅलन्स शीट
अपेक्षांचं बॅलन्स शीट
'अच्छे दिन आयेंगे' असं स्वप्न दाखवत निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांचं राजकीय कौशल्य देशानं अनुभवलं, पण आता १२१ कोटी लोकसंख्येच्या देशाला उत्सुकता आहे ती त्यांच्या आर्थिक नीतीची. १० जुलै रोजी मोदी सरकारतर्फे मांडल्या जाणाऱ्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत'नं विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या तज्ज्ञांची मतं,
आणि सर्वसामान्यांच्या ‘अपेक्षांचं बॅलन्सशीट’ तयार केलं. ते खास तुमच्यासाठी...
‘बजेट’ची कूळकथा!
बजेट हा शब्द आता आपल्या अंगवळणी पडला आहे. परंतु, या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तो प्रचलित कसा झाला, हे ठाऊक नसते. बजेट शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द ‘बॉगेत’ (ुङ्म४ॅी३३ी) पासून झाली आहे. याचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. (आपण आपले पैसेही चामड्याच्या पिशवीत अर्थात पाकिटातच ठेवतो.) आपल्या घरातही आपण ‘बजेट’ या शब्दाचा सर्रास वापर करत असतो. लग्नकार्य असेल किंवा महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालायचा असेल तर ‘बजेट’ हा शब्द आपसूक आपल्या तोंडी येतो.
चामड्याची पिशवी
‘बजेट’ शब्द प्रचलित होण्याचा एक छान किस्सा आहे. इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांच्याशी निगडित हा किस्सा आहे. १७३३ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वालपोल संसदेत आले़ येताना त्यांनी एक चामड्याची पिशवी आपल्यासोबत आणली होती. त्यांनी बजेट सादरही केले. परंतु, यानंतर काही दिवसांनंतर त्यांची चेष्टा करण्यासाठी ‘बजेट इज ओपन’ या नावाने एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आणि यानंतर हा शब्द प्रचलित झाला.
अरुण जेटली मांडणार ८४ वा अर्थसंकल्प
> भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत एकूण ३६ अर्थमंत्री झाले आहेत. व्यक्तीचा हिशेब केल्यास विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली हे २६ वे अर्थमंत्री आहेत.
> स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के. षण्मुगम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी संसदेला सादर केला.
> येत्या १० जुलैला सादर होणारा अर्थसंकल्प हा भारताच्या इतिहासातील ८४ वा अर्थसंकल्प राहील.
> आतापर्यंत ६६ पूर्ण अर्थसंकल्प आणि १३ अंतरिम अर्थसंकल्प सादर केले गेले आहेत. याशिवाय चार वेळा विशेष अर्थसंकल्पीय मागण्याही सादर होऊन मंजूर झाल्या आहेत.