सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:06+5:302015-08-18T21:37:06+5:30

Expect good rainfall in September | सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा

सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा

>अल निनो प्रभावहीन : ऑगस्ट कोरडाच जाण्याची भीती

पुणे : सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असून ऑगस्ट महिन्याचे पुढचे १० दिवस कोरडेच जातील, अशी भीती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात अल निनो घटक प्रभावहीन ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी दहा दिवस राज्यात पाऊस होण्याची चिन्हे नसून त्यामुळे सर्व पिकांना ताण सहन करावा लागेल. जनावरांच्या चार्‍याची समस्या निर्माण होऊ शकेल, मात्र सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होईल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साबळे म्हणाले, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात खंड पडेल, हा अंदाज खरा ठरला. आगामी दहा दिवस पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे खरिपाच्या सर्व पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागेल. जिरायती भागात जेथे उशिरा उगवण झाली आहे, त्या पिकांना धोका उद्भवेल. सध्याचा चारा पुढच्या दहा दिवसांत संपून नव्या चार्‍याची उगवण होईपर्यंत जनावरांच्या चार्‍याचा तुटवडा होऊ शकेल. पिण्याच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन काही ठिकाणी समस्या उद्भवू शकले, असेही ते म्हणाले.
२७ किंवा २८ ऑगस्टपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल. १५ ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस होईल. त्याचा फायदा रब्बीच्या पेरण्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.
हवामानशास्त्र विभागाने पावसात दहा टक्के घट होईल, असे म्हटले आहे. मात्र तो जून ते ऑगस्ट दरम्यानचा अंदाज आहे. अल निनोचा परिणाम पुढच्या पावसावर दिसेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, मला माझ्या अभ्यासानुसार अल निनोचा परिणाम जाणवणार नाही, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
-------------------

Web Title: Expect good rainfall in September