बँक भरती परीक्षा आता मराठीतूनही होणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 14:43 IST2019-07-04T14:24:24+5:302019-07-04T14:43:55+5:30
बँकांच्या परीक्षा मराठीसह तेरा भाषांमधून होणार

बँक भरती परीक्षा आता मराठीतूनही होणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली: विभागीय ग्रामीण बँकांच्यापरीक्षा मराठीसह तेरा भाषांमधून घेण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. ग्रामीण बँकांच्यापरीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून (आयबीपीएस) घेतल्या जातात. सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये या परीक्षा होतात.
बँकांच्या परीक्षा यापुढे मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणीपुरी, ऊडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत होतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत ही माहिती दिली. 'स्थानिक तरुणांना योग्य संधी मिळावी, त्यांना रोजगार मिळावा यासाठी बँकांच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होतील. विभागीय ग्रामीण बँकांमधील अधिकारी आणि सहाय्यक पदांच्या परीक्षांमध्ये हा पर्याय उपलब्ध असेल,' असं सीतारामन म्हणाल्या.
Examination for Regional Rural Banks to be conducted in 13 regional languages: Smt @nsitharaman@PIB_India@MIB_India@BJPLivepic.twitter.com/eutp9Vp1BI
— NSitharamanOffice (@nsitharamanoffc) July 4, 2019
बँकांच्या परीक्षा स्थानिक भाषेत घेतल्या जाव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होती. हा विषय ट्विटरवरदेखील ट्रेंडमध्ये होता. बँकांमधील पदं भरताना स्थानिक भाषेवर प्रभुत्व असावं अशी अट असते. मात्र तरीही बँकांच्या परीक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये होतात, अशी तक्रार अनेकांनी केली होती. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा होत नसल्यानं अनेक पात्र उमेदवार बँकेतील नोकऱ्यांपासून दूर राहतात, असं मतदेखील अनेकांनी व्यक्त केलं होतं.
गेल्या गुरुवारी काँग्रेस खासदार जी.सी. चंद्रशेखर यांनी बँकेच्या परीक्षा स्थानिक भाषांमध्ये घ्याव्यात अशी मागणी केली होती. कन्नड भाषेतून भाषण करत त्यांनी ही मागणी केली होती. याची दखल घेत सरकारनं बँक भरती परीक्षा 13 भाषेतून घेणार असल्याची घोषणा केली.