EVM मधील फेरफार सिद्ध करा - निवडणूक आयोगाचे केजरीवालांना आव्हान
By Admin | Updated: April 5, 2017 23:09 IST2017-04-05T23:09:46+5:302017-04-05T23:09:46+5:30
निवडणूक आयोगावर चौफेर आरोप करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे आव्हान निवडणूक आयोगाने स्वीकारले आहे.

EVM मधील फेरफार सिद्ध करा - निवडणूक आयोगाचे केजरीवालांना आव्हान
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - मतदारयंत्रातील फेरफारावरून गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर चौफेर आरोप करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे आव्हान निवडणूक आयोगाने स्वीकारले आहे. केजरीवाल यांनी मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे सिद्ध करून दाखवावेच, असे प्रतिआव्हान निवडणूक आयोगाने दिले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की आम्ही निवडणूक मतदान यंत्रात फेरफार होतो हे प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध करण्यासाठी टेक्नोक्रॅट, शास्रज्ञ आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी मतदान यंत्रे बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे तज्ज्ञसुद्धा उपस्थित राहणार आहेत. यावेळी नेतेमंडळी तेथे उपस्थित असलेल्या तज्ज्ञांना अशा फेरफारांबाबत प्रश्नही विचारू शकतील.
मात्र निवडणूक आयोगाच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याऐवजी अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी अजून एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी भाजपा वगळता इतर पक्ष मतदान यंत्राने मतदान घेण्यास तयार नसताना निवडणूक आयोग मतदान यंत्राद्वारे निवडणुका घेण्यासाठी का आग्रही आहे असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच दिल्लीती पालिका निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
याआधी मतदान यंत्रांमध्ये फेरफार होणे शक्य आहे. जर मतदान यंत्रे सार्वजनिक झाली तर त्यात होणारी फेरफार 72 तासांत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला दोन दिवसांपूर्वी दिले होते.