जगातील प्रत्येक तिसरी बालवधू भारतातील
By Admin | Updated: July 22, 2014 11:11 IST2014-07-22T11:08:37+5:302014-07-22T11:11:04+5:30
येत्या काही काळात महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणा-या भारतात बालविवाहाचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

जगातील प्रत्येक तिसरी बालवधू भारतातील
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २२ - येत्या काही काळात जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणा-या भारतात बालविवाहाचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगातील प्रत्येक तिसरी बालवधू ही भारतातील असते. 'एंडिग चाईल्ड मॅरेज - प्रोग्रेस अँड प्रॉस्पेक्ट' या अहवालानुसार दक्षिण आशिया, उप सहारा आफ्रिका आणि भारत हे बालविवाहाच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. जगभरातील बालवधूंपैकी सुमारे ४२ टक्के बालवधू दक्षिण आशियातील असून जगभरातील एक तृतियांश बालवधू भारतातील आहेत.
जगभरातील ७० कोटींहून अधिक महिलांचा १८ व्या वर्षाआधीच विवाह झाल्याचे या अहवालत म्हटले आहे. तर २५ कोटींहून अधिक महिलांचा विवाह वयाची १५ वर्षे पूर्ण करण्याआधीच पार पडला आहे.
जगातील ज्या देशांमध्ये बालविवाह होतो त्यातील पहिल्या दहांत नायजेरिया, बांग्लादेश, चाड, माली, मध्य आफ्रिकी गणराज्ये, भारत, गिनी, इथोपिया, बुरकिना फासो आणि नेपाळ यांचा समावेश होतो. भारतात २० ते ४९ वर्षांदरम्यानच्या २७ टक्के स्त्रियांचा विवाह १५ वर्षांच्या आधीच झाल्याचेही या अहवालात म्हटले आह.