नवी दिल्ली: प्रत्येक 'AA'साठी 'RV' आहे, असं म्हणत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसनंराफेल डीलवरुन केलेल्या आरोपांना सीतारामन यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी कोणाचंही नाव न घेता, फक्त आद्याक्षरांचा वापर करत राहुल गांधींवर निशाणा साधला. 'प्रत्येक 'AA' साठी 'RV' नव्हेच तर 'Q' देखील आहे. विनोद करण्यासाठी आद्याक्षरांचा वापर करणं सोपं आहे. मात्र ही दुधारी तलवार आहे. त्यानं तुमच्यावरदेखील वार होऊ शकतो,' असा शब्दांमध्ये सीतारामन यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. 'RV' हे पंतप्रधानांचे जावई नव्हते, तर संपूर्ण देशाचे जावई होते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. सीतारामन यांनी रॉबर्ट वाड्रांच्या नावांच्या आद्याक्षरांचा वापर करत काँग्रेसला लक्ष्य केलं. रॉबर्ट वाड्रा हे सोनिया गांधींचे जावई आहेत. गुरुग्राममधील अनेक वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे आरोप भाजपाकडून करण्यात आले आहेत.
निर्मला सीतारामनांनी केलं रॉबर्ट वाड्रांचं नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 16:48 IST