एव्हरेस्टची उंची नव्याने मोजणार
By Admin | Updated: April 11, 2017 00:45 IST2017-04-11T00:45:25+5:302017-04-11T00:45:25+5:30
भारतीय सर्वेक्षण विभागाचे (सर्व्हे आॅफ इंडिया) यंदाचे २५० वे वर्ष असून या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून या विभागाने जगातील सर्वात उंच पर्वतशिखर

एव्हरेस्टची उंची नव्याने मोजणार
नवी दिल्ली : भारतीय सर्वेक्षण विभागाचे (सर्व्हे आॅफ इंडिया) यंदाचे २५० वे वर्ष असून या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून या विभागाने जगातील सर्वात उंच पर्वतशिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एव्हरेस्ट’च्या उंचीचे नव्याने मोजमाप करण्याचे ठरविले आहे.
दोन वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर वैज्ञानिकांनी नानाविध शंका उपस्थित केल्यानंतर नेपाळच्या सर्वेक्षण खात्याच्या सहकार्याने ‘एव्हरेस्ट’ची उंची पुन्हा एकदा मोजण्याचा प्रस्ताव सर्व्हे आॅफ इंडियाने केला. आता तसा औपचारिक प्रस्ताव राजनैतिक माध्यमांतून नेपाळकडे पाठविण्यात आला असून त्यांच्याकडून होकार येताच हे काम याच वर्षी सुरू केले जाईल.
सर जॉर्ज भारताचे सर्व्हेअर जनरल असताना सन १८५५ मध्ये या शिखराची उंची सर्वप्रथम मोजून ते जगातील सर्वात उंच शिखर असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले गेले. त्यावेळी मोजलेली ‘एव्हरेस्ट’ची उंची ८,८४० मीटर होती. शंभर वर्षांनी सन १९५६ मध्ये सर्व्हे आॅफ इंडियाने ‘एव्हरेस्ट’चे पुन्हा मोजमाप केले व त्याची अचूक उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) असल्याचे ठरविले.
दीडशे वर्षांतील तिसरे मोजमाप
एव्हरेस्ट नाव कशामुळे ?
नेपाळमध्ये ‘सागरमाथा’ व चीनमध्ये ‘चोमोलुंगमा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शिखरास अनेक स्थानिक नावे आहेत. सन १८६५ मध्ये भारताचे तेव्हाचे सर्व्हेअर जनरल अॅन्ड्र्यु वॉ यांनी या शिखरास अधिकृत नाव देण्याचा प्रस्ताव रॉयल जिओग्राफिकल सोसायटीकडे पाठविला. व त्यानुसार ज्यांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण करून सर्वप्रथम उंची मोजली गेली त्या सर एव्हरेस्ट यांचे नाव या शिखरास दिले गेले.