विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही: उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:29 IST2025-03-25T14:28:24+5:302025-03-25T14:29:36+5:30
आरोपीवर एका प्रकरणात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासही न्यायालयाने नकार दिला.

विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही: उच्च न्यायालय
प्रयागराज: विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही तसेच तिला नियंत्रणात ठेवण्याचाही त्याला अधिकार नसल्याचे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे. पत्नीचा खासगीपणाचा तसेच स्वायत्ततेचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे या न्यायालयाने एका प्रकरणी निकाल देताना सांगितले. आरोपीवर एका प्रकरणात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासही न्यायालयाने नकार दिला.
पत्नीसोबत व्यतीत नाजूक क्षणांचे व्हिडीओ पतीने सोशल मीडियावर शेअर केले. याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यास न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी नकार दिला. विवाह या गोष्टीचे पावित्र्य पतीने नष्ट केले. त्याने व्हिडीओ प्रसारित करून पत्नीचा विश्वासघात केला. पत्नीचा विश्वास त्याने मोडला. हा गंभीर गुन्हा आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
परस्पर विश्वास हवा
न्यायालयाने म्हटले आहे की, पती व पत्नी या दोघांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी परस्पर विश्वास खूप महत्त्वाचा असतो. नेमका हा विश्वास तोडण्याचे काम पती प्रद्युन्म यादव याने केले. पत्नीलाही तिचे अधिकार, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते हे पतीने लक्षात घेतले पाहिजे.
मीरपूर येथील एक व्यक्ती याप्रकरणी आरोपी असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तिला कल्पना नसताना, तिची परवानगी न घेता प्रद्युन्म याने फेसबुकवर वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केला.
पती-पत्नीमधील वाद समझोत्याने सुटेल
पतीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, माहिती कायद्याच्या कलम ६७ च्या आधारे दाखल केलेल्या गुन्ह्यांत पती प्रद्युन्म यादववर कोणताही आरोप सिद्ध होण्याची शक्यता नाही. हा पती-पत्नीमध्ये समझोता होऊन हे प्रकरण मिटण्याची शक्यताही वकिलांनी व्यक्त केली.
मात्र, सरकारी वकिलांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचा आरोपी हा पती असला तरी त्याच्या हातून गंभीर गुन्हा घडला आहे.