Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केले आहे, संपलेले नाही, असेही भारताने स्पष्ट केले आहे. यानंतर आता भारतातील खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील देशांमध्ये जाण्यासाठी रवाना होत असून, भारताची बाजू भक्कमपणे जागतिक मंचावर मांडली जाणार आहे. यातच आफ्रिकेतील एका देशाने आता भारताला समर्थन दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी नेतृत्व असल्याचे म्हटले आहे.
पूर्व आफ्रिकेतील इथियोपियाचे भारतातील राजदूत फेसेहा शॉवेल गेब्रे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत प्रतिक्रिया दिली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा इथियोपिया निषेध करतो. पंतप्रधान मोदी हे धाडसी आहेत. पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना भारताने जबाबदारीने प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानात जाऊन काही केले नाही. पाकिस्तानने भारतात समस्या निर्माण केल्या. पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात आले होते. हे खूपच भयंकर आणि अस्वीकार्य आहे. त्यांनी धर्माच्या आधारावर लोकांचे वर्गीकरण करून त्यांना ठार मारले. ज्याप्रमाणे भारत सध्या दहशतवादाशी दोन हात करत आहे, त्याचप्रमाणे इथियोपिया पूर्व आफ्रिकेतील दहशतवादाविरोधात संघर्ष करतो, असे गेब्रे यांनी म्हटले आहे.
भारत सर्वांसाठी चांगला आहे
पुढे बोलताना ते म्हणाले की, इथिओपियामध्ये हिंदू नाहीत, ख्रिश्चन आणि मुस्लिम समान संख्येने आहेत. पण तरीही ते योगासने करतात. ते ध्यानधारणा, प्रार्थना करतात. तुम्ही जगात कुठेही गेलात आणि 'योग' हा शब्द उच्चारलात तर लोकांना तुम्ही कशाबद्दल बोलत आहात हे कळते. जसे भारतीयांनी जगाला योग दिला आहे, तसेच इथिओपियाने कॉफी दिली आहे. आम्ही योग आणि कॉफीचा एकत्रितपणे प्रचार करू. भारत सर्वांसाठी चांगला आहे. आपल्याला भारताकडून खूप काही शिकण्याची गरज आहे, असेही गेब्रे यांनी नमूद केले.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’वर भारताची भूमिका जागतिक स्तरावर मांडण्यासाठी जाणाऱ्या तीन शिष्टमंडळांना सदस्यांना परराष्ट्र सचिव विक्रम मिसी यांनी पाकिस्तानच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या भारतविरोधी दहशतवादी कारवायांसंदर्भात सविस्तर माहिती दिली. भारत कोणत्याही हल्ल्यास ठोस उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.