आणीबाणी काळा काळ; आठवणीने थरकाप उडतो - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 08:17 IST2023-06-19T07:59:28+5:302023-06-19T08:17:11+5:30
पंतप्रधान म्हणाले की, देश जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीच्या गुन्ह्याला समजून घेणे आवश्यक आहे.

आणीबाणी काळा काळ; आठवणीने थरकाप उडतो - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : २५ जून विसरू शकत नाही, याच दिवशी आमच्यावर आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारताच्या इतिहासातील हा काळा काळ होता. लाखो लोकांनी पूर्ण ताकदीनिशी आणीबाणीला विरोध केला. त्या काळात लोकशाहीच्या समर्थकांचा ज्या प्रकारचा छळ झाला ते आठवले की आजही मनाचा थरकाप उडतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
‘मन की बात’च्या १०२ व्या भागात पंतप्रधान मोदींनी रविवारी जागतिक योग दिन, ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाची आपत्कालीन परिस्थिती, खेळ, २०२५ पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याची मोहीम आणि निसर्ग संवर्धन याबद्दल मते मांडली. चक्रीवादळात कच्छच्या लोकांनी दाखवलेल्या अभूतपूर्व धैर्याचे त्यांनी कौतुक केले.
मोदी म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. आपण आपली राज्यघटना सर्वोपरी मानतो, म्हणून आपण २५ जूनला कधीही विसरू शकत नाही. तो काळा काळ होता. याच दिवशी आपल्या देशात आणीबाणी लागू झाली होती. लाखो लोकांनी याला पूर्ण ताकदीनिशी विरोध केला होता, असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान म्हणाले की, देश जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीच्या गुन्ह्याला समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे आजच्या तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि महत्त्व समजणे सोपे जाईल, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवरायांचा उल्लेख...
या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली. शिवाजी महाराजांच्या शौर्याशिवाय, त्यांच्या शासन आणि व्यवस्थापन कौशल्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत केलेले कार्य आजही भारतीय इतिहासाची शान वाढवत आहे. त्यांनी बांधलेले किल्ले इतक्या शतकांनंतरही समुद्राच्या मधोमध अभिमानाने उभे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पाच दशकांनंतर निळवंडे होतेय पूर्ण
पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण होत आहे. काही दिवसांपूर्वी चाचणी दरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळची जी छायाचित्रे समोर आली ती खरच खूप भावूक करणारी होती. गावातील लोकं दिवाळी असल्यासारखी नाचत होती. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान