७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:48 IST2026-04-08T13:47:06+5:302026-04-08T13:48:11+5:30
पश्चिम बंगाल निवडणुकीआधी टीएमसी आणि केंद्रीय निवडणूक आयोगात खडाजंगी

७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
कोलकाता - पश्चिम बंगालच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसं सत्ताधारी टीएमसीकडून निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्ले वाढले आहेत. तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोग भाजपासाठी काम करतोय असा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेनंतर ९० लाख मतदारांची नावे हटवण्यात आली. त्याविरोधात टीएमसी शिष्टमंडळाने बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली. ही बैठक फक्त ७ मिनिटे चालली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी आमचे काहीही ऐकले नाही आणि ७ मिनिटांनंतर आम्हाला गेट आऊट म्हटलं.
आमचं म्हणणं ऐकलेच नाही - डेरेन ओ ब्रायन
टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन बैठकीत ओरडताना आम्ही इथं ऐकायला आलो नाही असं म्हटलं. त्यानंतर बैठकीतील वातावरण तापले आणि टीएमसी शिष्टमंडळ बाहेर पडले असं निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. डेरेक ओ ब्रायन यांनी म्हटलं की, निवडणूक आयुक्तांसोबत ७ मिनिटे बैठक चालली. ज्ञानेश कुमार यांनी आम्हाला Get Lost म्हटलं. आम्ही संसदेतील दुसरा मोठा पक्ष आहोत. परंतु आमचे ऐकूनच घेतले नाही असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने ट्विट करत बंगालमध्ये निवडणूक भयमुक्त, हिंसामुक्त होतील असं म्हटलं आहे.
VIDEO | Delhi: TMC delegations meets Chief Election Commissioner Gyanesh Kumar on the deletion of nearly 91 lakh voters' names from the electoral rolls in West Bengal.
— Press Trust of India (@PTI_News) April 8, 2026
TMC MP Derek O'Brien (@derekobrienmp) says, "I want to tell you what the CEC told us within seven minutes of… pic.twitter.com/xdYGJHRRCq
तसेच मी निवडणूक आयुक्तांना आव्हान करतो, आज जे काही घडले त्याचे व्हिडिओ, ऑडिओ जारी करा. ते भारतातील एकमेव मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्यांच्याविरोधात लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे त्यांना पदावरून हटवण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. या मुद्द्यावर संध्याकाळी ४ ते ४.३० या काळात भाजपाविरोधी पक्ष एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिली. तर टीएमसी नेते साकेत गोखले यांनीही निवडणूक आयोगावर आरोप करत बैठकीची ट्रान्सक्रिप्ट जारी करण्याचं आव्हान आहे.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आम्हाला सरळ 'चालते व्हा' असं सांगितले. आम्ही निवडणूक आयोगाला या बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध करण्याचे आव्हान देतो. अन्यथा आम्ही ते प्रसिद्ध करू असं साकेत गोखले यांनी म्हटलं. पश्चिम बंगालमध्ये १५२ जागांसाठी २३ मार्च रोजी आणि १४२ जागांसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार आहे. शांततेत मतदान पार पाडण्यासाठी राज्यात सुरक्षा दलाच्या २,४०० कंपन्या आणि ३,००० सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहेत. मतदानानंतर होणारा संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) ५०० कंपन्या मतमोजणीनंतरही तैनात राहतील.