लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मतचोरीच्या मुद्यावरून निवडणूक आयोगावर आणखी गंभीर आरोप केले. तसेच कर्नाटकमधील आळंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची कापलेली नावं आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात वाढवलेली मतदारसंख्या याबाबतचे पुरावे सादर केले. त्यानंतर आता भारतीय निवडणूक आयोगानेराहुल गांधींच्या आरोपांना तातडीने प्रत्युत्तर देत राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले. राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला. तसेच कॉल सेंटरच्या मदतीने मतदारांची नावं कापण्यात आल्याचा राहुल गांधी यांनी केलेला आरोपही निवडणूक आयोगाने फेटाळून लावला असून, असं करणं शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. राहुल गांधी यांनी जसा दावा केला आहे तशा पद्धतीने कुठल्याही मतदाराचं नाव कुठलीही सरर्वसामान्य व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने हटवू शकत नाही. कुठल्याही व्यक्तीचं नाव हटवण्यापूर्वी त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, असा दावाही त्यांनी केला.
२०२३ मध्ये आलंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावं हटवण्याचे काही प्रयत्न झाले होते. या प्रकरणी निवडणूक आयोगाने स्वत: तक्रार दिली होती, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली. दरम्यान, २०२३ साली झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आलंद मतदारसंघात काँग्रेसचे बी.आर. पाटील विजयी झाले होते.