बंगळुरू : ‘निवडणूक आयोग व भाजपने मतांची चोरी केली,’ या आरोपाचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुनरुच्चार केला. मी जे आरोप केले ते सत्य गोष्टींवर आधारित असल्याचे शपथपत्र आयोगाने मला देण्यास सांगितले आहे; पण मी संसदेत संविधान हातात घेऊन आधीच शपथ घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ बंगळुरूमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांनी ‘मतदान अधिकार मोर्चा’ काढला होता. यावेळी राहुल गांधी यांनी भाषणात सांगितले की, मी ज्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले, त्यानंतर आयोगाने आपली वेबसाइट बंद केली आहे.
३ राज्यांतील वेबसाइट बंदमध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमधील निवडणूक आयोगाच्या वेबसाइट्स बंद करण्यात आल्या आहेत; कारण आयोगाला माहिती आहे की, लोक या तपशिलावरून प्रश्न विचारायला लागले तर निवडणूक आयोगाची सारी संरचनाच कोसळू शकते, असे राहुल गांधी म्हणाले.
स्वाक्षरीसहित शपथपत्र द्या : आयोगआपली माहिती अचूक असल्याचा विश्वास असल्यास स्वाक्षरीसहित तसे शपथपत्र राहुल गांधी यांनी सादर करावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. ते शपथपत्र देणार नसतील तर त्याचा अर्थ त्यांना आपल्याच विश्लेषण व निष्कर्षांवर विश्वास नाही असा होईल, असेही आयोगाने म्हटले.
मतांची चोरी झाल्याच्या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची आयोगाने चौकशी करावी. आपली जबाबदारी फक्त भाजपपुरतीच आहे असे जर आयोगाला वाटत असेल तर त्यांना या गोष्टीचा पुनर्विचार करावा लागेल.खा. प्रियांका गांधी, काँग्रेस
राहुल गांधी जे आरोप निवडणूक आयोगावर करत आहेत, त्यात मनोरंजनाशिवाय दुसरे काहीही नाही, त्यांनी बहुधा सलीम जावेद यांच्याकडून एखादी स्क्रिप्ट घेतली असावी. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री