आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: July 24, 2014 18:52 IST2014-07-24T18:52:00+5:302014-07-24T18:52:00+5:30
पश्चिम बंगालमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा मृतदेह झाडावर लटकवल्याची संतापजनक घटना घडली आहे.

आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन टीम
मिदनापूर (प.बंगाल), दि. २४ - पश्चिम बंगालमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा मृतदेह झाडावर लटकवल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनेतील मुख्य आरोपी रतन दास (वय ६०) व त्याच्या दोघा आरोपींना बेदम मारहाण केली असून या मारहाणीत दासचा मृत्यू झाला आहे. तर दासचे अन्य दोन साथीदार जखमी झाले आहेत.
मिदनापूर जिल्ह्यातील राजनगर येथे राहणारी आठ वर्षाची मुलगी बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह घरापासून २०० मीटर अंतरावर आढळला. पिडीत मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर नराधमांनी तिचा मृतदेह झाडावर लटकवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांनी मृतदेह झाडावर लटकवल्याच्या घटनेला नकार दिला आहे. या बलात्कारामध्ये गावातील रतन दास या वृध्दाचा सहभाग असल्याचे ग्रामस्थांना समजले. यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि मुलीच्या कुटुंबाने रतन दासच्या घरावर धडक दिली. संतप्त जमावाने रतन दासला बेदम मारहाण करुन त्याचे घर पेटवून दिले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. तर अन्य दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन दासने यापूर्वीही गावातील लहान मुलींशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.