मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 06:44 IST2025-06-07T06:43:45+5:302025-06-07T06:44:06+5:30
इम्फाळ पश्चिम आणि बिष्णूपूर जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी केली कारवाई

मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
इम्फाळ: बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित आठ दहशतवाद्यांना मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम आणि बिष्णूपूर जिल्ह्यांतून सुरक्षा दलांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील घारी माखा लैकाई परिसरातून गुरुवारी युनायटेड पीपल्स पार्टी ऑफ कांगलीपाक (यूपीपीके) या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली, तर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या चार दहशतवाद्यांना ताओथोंग खुनौ (इम्फाळ पश्चिम) आणि बिष्णूपूर येथून अटक करण्यात आली. प्रीपाक (प्रो) या संघटनेच्या एका दहशतवाद्याला बिष्णूपूर जिल्ह्यातील वांगू अहल्लूप मयाई लैकाई येथे जेरबंद करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. या आठ जणांकडून काही ठिकाणी शस्त्रास्त्रे, दारूगोळाही जप्त केला आहे.