ईडीने केजरीवाल आणि आप'वर आरोपपत्रात केले आरोपी, केले 'हे' गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 14:53 IST2024-07-10T14:43:36+5:302024-07-10T14:53:21+5:30
ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोवा निवडणुकीत लाच स्वरुपात मिळालेला पैसा वापरण्यात आल्याची केजरीवालांना माहिती होती, असा ईडीचा दावा आहे.

ईडीने केजरीवाल आणि आप'वर आरोपपत्रात केले आरोपी, केले 'हे' गंभीर आरोप
दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. चार्जशीटमध्ये ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे. आरोपपत्रात ईडीने अरविंद केजरीवाल यांचा घोटाळ्यातील किंगपिन आणि सूत्रधार म्हणून वर्णन केले आहे. एवढेच नाही तर गोव्याच्या निवडणुकीत लाचेच्या पैशाचा वापर झाल्याचीही माहिती असल्याचा दावा ईडीने केला आहे.
भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते
आरोपपत्रात अरविंद केजरीवाल आणि आरोपी विनोद चौहान यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचा तपशील देण्यात आला आहे. के कविता यांच्या पीएने विनोदच्या माध्यमातून आम आदमी पक्षाला गोवा निवडणुकीसाठी २५.५ कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे. 'विनोद चौहान यांचे अरविंद केजरीवाल यांच्याशी चांगले संबंध असल्याचे या गप्पांमधून स्पष्ट झाले आहे, असा दावा ईडीने केला आहे.
मंगळवारी न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत केजरीवाल यांना १२ जुलैला समन्स पाठवले. मद्य धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. ते सध्या तिहार तुरुंगात आहे. केजरीवाल यांना १२ जुलै रोजी हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले.
दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडी याचिका १५ जुलै रोजी सुनावणीसाठी लिस्टेड केली आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाच्या २० जूनच्या आदेशाला स्थगिती दिली होती, या अंतर्गत केजरीवाल यांना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांना ईडीच्या वकिलांनी सांगितले की, तपास यंत्रणेला केजरीवाल यांच्या याचिकेवरील उत्तराची प्रत मंगळवारी रात्री ११ वाजता मिळाली आणि ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.