EC and SC take decisions against oppositions, who questions on EVM | निकालापूर्वी विरोधकांना दुहेरी झटका, ईव्हीएम संशयावरुन EC आणि SC दोघांनी फटकारले 
निकालापूर्वी विरोधकांना दुहेरी झटका, ईव्हीएम संशयावरुन EC आणि SC दोघांनी फटकारले 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. व्हीव्हीपॅट मतदानाची 100 टक्के मतमोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. इतकचं नाहीतर प्रत्येक वेळेला त्याच त्याच विषयांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. 

याचदरम्यान मंगळवारी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षात बैठक होणार आहे. त्यानंतर ईव्हीएमबाबतीत निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. ईव्हीएमवर घेतलेल्या संशयावरुन निवडणूक आयोगाने यूपीतील 4 याचिका फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएम सुरक्षित असून त्यावर विश्वास ठेवावा असं निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

एका याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात याचिका करत मतदानाच्या पडताळणीसाठी ईव्हीएमसोबत जोडलेल्या व्हीव्हीपॅटच्या पावत्यांचीही मतमोजणी करावी अशी मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार सर्व ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट पक्षाच्या उमेदवारांसमक्ष सुरक्षित सीलबंद केल्या आहेत. त्याचे व्हिडीओही काढण्यात आले आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. उत्तर प्रदेशात निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या सुरक्षेला घेऊन केलेल्या याचिका फेटाळल्या. राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर विश्वास ठेवावा. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे. एक्झिट पोलनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय पराभवाच्या भितीपोटी घेतला जातोय अशी टीका भाजपाने विरोधकांवर केली आहे. 


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

'ईव्हीएमवर संशय नको म्हणून 3 राज्यात काँग्रेसचा विजय; हे तर भाजपाचं षडयंत्र'

मात्र काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील काँग्रेसच्या विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जर एक्झिट पोलप्रमाणे निकाल लागले तर ज्या राज्यात काँग्रेस जिंकली ते फक्त भाजपाचं षडयंत्र होतं असा आरोप त्यांनी केला. या तीन राज्यातील निकाल काँग्रेसच्या बाजूने देऊन ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय दूर करण्याचा भाजपाचा डाव होता हे सिद्ध होईल असं त्यांनी सांगितलं होतं. तर ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. 


Web Title: EC and SC take decisions against oppositions, who questions on EVM
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.