सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सर्वांत कमी; हजारो वर्षांनंतर पुन्हा जुळून येणार योग
By देवेश फडके | Updated: January 2, 2021 09:33 IST2021-01-02T09:27:46+5:302021-01-02T09:33:49+5:30
सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर आज (शनिवारी) सर्वांत कमी असणार आहे. हे दोन ग्रह सर्वाधिक जवळ असणार आहेत. यानंतर असा योग सन ६४३० मध्ये जुळून येऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सर्वांत कमी; हजारो वर्षांनंतर पुन्हा जुळून येणार योग
नवी दिल्ली : खगोलीय शास्त्रानुसार सूर्याभोवती सर्व ग्रह फिरत असतात. प्रत्येक ग्रहाचे सूर्याभोवतीचे चलन, कालावधी यात फरक आहे. पृथ्वीदेखील सूर्याभोवती भ्रमण करत असते. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर आज (शनिवारी) सर्वांत कमी असणार आहे. याचाच अर्थ सूर्य आणि पृथ्वी हे दोन ग्रह सर्वाधिक जवळ असणार आहेत.
सन २०२१ च्या दुसऱ्याच दिवशी हा अद्भूत योग जुळून येत आहे. याबाबत माहिती देताना प्लॅनेटरी सोसायटी ऑफ इंडियाचे संचालक रघुनंदन कुमार यांनी सांगितले की, ०२ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वांत कमी असेल. या कालावधीत सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर १४७,०९३,१६३ किमी राहील. सामान्य अंतरापेक्षा हे अंतर ५० लाख किमी कमी असणार आहे. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार परिभ्रमण करत असते. यामुळे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर कमी जास्त होत असते. मात्र, सूर्य आणि पृथ्वी जवळच्या कक्षेत येण्याचे प्रमाण प्रतिवर्षी बदलत असते, अशी माहिती कुमार यांनी दिली.
खगोलीय शास्त्रात याला 'पेरिहेलियन' असे म्हटले जाते. ०२ जानेवारी २०२१ रोजी सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर ०.९८३२५७१ प्रकाशवर्ष असेल. तर, ०६ जुलै २०२१ रोजी सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सर्वाधिक असेल. जुलै महिन्यात सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर १.०१६७२९२ प्रकाशवर्ष असेल, असेही कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, सन २०२१ च्या सुरुवातीलाच हा अद्भूत योग जुळून येत असून, खगोल शास्त्रज्ञांसाठी ही पर्वणी मानली जात आहे. यापूर्वी सन १२४६ मध्ये सूर्य आणि पृथ्वी सर्वांत कमी अंतरावर आले होते. आता यानंतर असा योग सन ६४३० मध्ये जुळून येऊ शकेल, असे सांगितले जात आहे.