कॉलेज डिग्रीची गरज नाही! सरकार तरुणांना देणार नोकरी, पगार ३० हजार; शिंदेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 21:10 IST2022-05-10T21:07:47+5:302022-05-10T21:10:53+5:30
लवकरच लाखभर तरुणांची भरती होणार; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची मोठी घोषणा

कॉलेज डिग्रीची गरज नाही! सरकार तरुणांना देणार नोकरी, पगार ३० हजार; शिंदेंची घोषणा
मुंबई: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकार कमाईची संधी देणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कॉलेजच्या डिग्रीची आवश्यकता नाही. पुढील काही वर्षांत देशात जवळपास १ लाखाहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत ड्रोन पायलट्सची बंपर भरती होईल.
बारावी उत्तीर्ण झालेल्या व्यक्ती ड्रोन पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकतात. त्यासाठी कॉलेजच्या डिग्रीची गरज नाही. येणाऱ्या काही वर्षांत जवळपास १ लाख ड्रोन पायलट्सची आवश्कयता भासेल. ड्रोन पायलट होण्याची इच्छा असलेल्यांना दोन-तीन महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल. ड्रोन पायलटला ३० हजार रुपये मासिक पगार मिळेल, अशी माहिती ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्लीत निती आयोगाच्या एक्सपीरियन्स स्टुडिओचं लॉन्चिंग केलं. २०३० पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब बनवण्याचं लक्ष्य असल्याचं शिंदे म्हणाले. औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवं तंत्रज्ञान विकसित व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटतं, असं त्यांनी सांगितलं.