Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनात सापडलेल्या मृत गरुडावर आढळलं ट्रॅकिंग डिव्हाइस, अधिकारी धास्तावले अन् सत्यही कळलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:46 IST2022-05-31T16:46:07+5:302022-05-31T16:46:49+5:30
ट्रॅकिंग डिव्हाइससह टॅग केलेलं एक गरुड सोमवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या लॉनमध्ये मृतावस्थेत आढळून आले. ज्यामुळे दिल्ली पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.

Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनात सापडलेल्या मृत गरुडावर आढळलं ट्रॅकिंग डिव्हाइस, अधिकारी धास्तावले अन् सत्यही कळलं!
नवी दिल्ली-
ट्रॅकिंग डिव्हाइससह टॅग केलेलं एक गरुड सोमवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या लॉनमध्ये मृतावस्थेत आढळून आले. ज्यामुळे दिल्ली पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. चौकशीनंतर वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या एका मुंबईस्थित अधिकार्यांनी पक्ष्याच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी आणि त्याच्या विश्रांतीची ठिकाणं, वेग आणि अन्न याबद्दल माहिती मिळविण्यासाठी एक उपकरण त्याच्याशी जोडलं होतं अशी माहिती समोर आली. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कपावळावरच्या आठ्या सैल झाल्या.
दिल्लीच्या काही भागात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर हे गरुड राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील लॉनमध्ये मृतावस्थेत सापडले. "पाऊस थांबल्यानंतर दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुरक्षा यंत्रणांना राष्ट्रपती भवनातील लॉनमध्ये एक गरुड मृतावस्थेत सापडले आणि ते उचलण्यासाठी गेले असता त्याला जोडलेले सॅटेलाइट ट्रॅकिंग यंत्र दिसून आल्यानं ते थक्क झाले. अधिकाऱ्यांनी ताबडतोब नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली", असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
गुप्तचर संस्था, दिल्ली पोलिसांची सुरक्षा शाखा आणि विशेष सेलचे अधिकारी यांना याची तातडीने माहिती देण्यात आली होती. डिव्हाइस स्कॅन केले गेले आणि एक चिठ्ठी देखील सापडली, ज्यामध्ये मुंबईस्थित अधिकार्यांचा उल्लेख होता. यामागची सत्य पडताळणी करण्यास सांगितलं गेलं होतं. चौकशीअंती यात संशयास्पद काहीच आढळलेलं नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या एका मुंबईस्थित अधिकार्यांनी पक्ष्याच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी आणि अन्य माहिती मिळवण्यासाठी संबंधित डिव्हाइस गरुडाला लावलं होतं असं चौकशीअंती निष्पन्न झालं आहे.