सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:06 IST2025-12-11T14:06:19+5:302025-12-11T14:06:49+5:30
E20 Ethanol Benefits, Nitin Gadkari winter session: काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर इथेनॉल मिश्रित इंधनाविरोधात मोठी लाट आली होती. नितीन गडकरी यांना टार्गेट केले गेले होते. अनेकांना ई२० मिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी येत होते, तसेच इंजिनाचे पार्ट नादुरुस्त होत होते. मायलेज कमी आल्याने पेट्रोल पंपावर जाण्याची वारंवारता वाढली होती.

सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळून (E20) वापरण्याच्या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणावर रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण माहिती दिली. 'ई-२०' इंधनामुळे जुन्या गाड्यांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, तसेच हे धोरण देशाची अर्थव्यवस्था, शेतकरी आणि पर्यावरणासाठी किती फायदेशीर आहे, हे मंत्र्यांनी सविस्तर स्पष्ट केले.
गडकरी यांनी सांगितले की, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) या संस्थेद्वारे जुन्या गाड्यांवर E20 इंधनाची १ लाख किलोमीटरपर्यंतची टेस्टिंग करण्यात आली आहे. या चाचणीत कोणत्याही गाडीचे इंजिन बिघडले नाही किंवा गाडीच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही. गाडी सुरू होण्यास किंवा चालण्यास कोणतीही अडचण आली नाही.
भारत दरवर्षी सुमारे २२ लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करतो. इथेनॉलचा वापर वाढवून हे आयात बिल भविष्यात पूर्णपणे संपवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इथेनॉल ब्लेंडिंग धोरणाचे महत्त्व सांगितले. E20 मुळे भारताच्या सध्याच्या $१५० अब्ज डॉलरच्या तेल आयातीत २० टक्क्यांनी मोठी घट होईल, ज्यामुळे मोठी परकीय गंगाजळी वाचेल. इथेनॉल धोरणामुळे आतापर्यंत अंदाजे ४० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. पूर्वी इथेनॉल फक्त ऊस आणि मळी पासून बनवले जात होते. मात्र आता मक्याचा वापर सर्वात जास्त (४६-४८%) होत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मक्याला चांगला भाव मिळत आहे आणि ते त्याच्या लागवडीकडे वळत आहेत.
प्रदूषण कमी
इथेनॉल एक 'ग्रीन फ्यूल' असल्यामुळे, त्याच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होते. गडकरींच्या माहितीनुसार, हे प्रदूषण कमी करणे ३० कोटी झाडे लावण्याइतके फायदेशीर आहे. तसेच, प्रदूषण ६५% पर्यंत कमी होत आहे.
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर इथेनॉल मिश्रित इंधनाविरोधात मोठी लाट आली होती. नितीन गडकरी यांना टार्गेट केले गेले होते. अनेकांना ई२० मिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी येत होते, तसेच इंजिनाचे पार्ट नादुरुस्त होत होते. मायलेज कमी आल्याने पेट्रोल पंपावर जाण्याची वारंवारता वाढली होती. गडकरींच्या मुलाने इथेनॉलच्या फॅक्टरी टाकल्याचेही आरोप केले जात होते. याला गडकरींनी आपल्याविरोधात पेड ट्रोलिंग सुरु केल्याचे सांगत गाडी खराब होत असेल तर दाखवून द्या, असे आव्हान दिले होते.