MIM च्या विरोधामुळे योगादिन वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे
By Admin | Updated: June 4, 2015 18:10 IST2015-06-04T18:10:32+5:302015-06-04T18:10:32+5:30
जागतिक योगदिनानिमित्त २१ जून रोजी राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी योगासने करावीत अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या आहेत.

MIM च्या विरोधामुळे योगादिन वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - जागतिक योगदिनानिमित्त २१ जून रोजी राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी योगासने करावीत अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या आहेत. या सूचना म्हणजे सक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून तरीही सर्वांनी स्वेच्छेने हा दिवस योगदिन म्हणून साजरा करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मात्र मुस्लीम इत्तेहिदूल मुसलमीन या पक्षाचे आमदार वारीस पठाण यांनी मात्र या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला असून भाजपाचा भारत हिंदूराष्ट्र करण्याच्या अजेंडाचा हा भाग असल्याचे म्हटले आहे.
भाजपाच्या प्रवक्त्यांनी योगाचा हिंदू धर्माशी सांगड घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे तर योगाची सक्ती करणे हे घटनेने नागरिकांना दिलेल्या आचार विचाराच्या स्वातंत्र्याच्या विरोधी असल्याचे एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनामुळे संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा जागतिक योगा दिन म्हणून जाहीर केला आणि जवळपास १७७ देशांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, ज्यामध्ये अनेक मुस्लीम देशांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, योगविद्येचा जन्म झालेल्या भारतातच एमआयएमच्या माध्यमातून विरोध ठाकला आहे.