बनावट जात प्रमाणपत्रामुळे येणार नोकरीवर कु-हाड
By Admin | Updated: July 6, 2017 14:35 IST2017-07-06T14:26:29+5:302017-07-06T14:35:08+5:30
बनावट जात प्रमाणपत्राद्वारे डिग्री किंवा नोकरी मिळवणा-यांना सर्वोच्च न्यायालयानं झटका दिला आहे.

बनावट जात प्रमाणपत्रामुळे येणार नोकरीवर कु-हाड
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - बनावट जात प्रमाणपत्राद्वारे डिग्री किंवा नोकरी मिळवणा-यांना सर्वोच्च न्यायालयानं झटका दिला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक निर्बंध लादले आहेत. जर एखादी व्यक्ती बनावट जात प्रमाणपत्रासोबत पकडली गेल्यास त्याला डिग्री आणि नोकरी गमवावी लागणार आहे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
बनावट जात प्रमाणपत्र बाळगणा-या व्यक्तीला शिक्षाही होऊ शकते, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. कोणी व्यक्ती ब-याच काळापासून नोकरी करतेय आणि ती व्यक्ती दोषी आढळली, तरीही नोकरी सोडावी लागणार आहे. नोकरी करत असताना 20 वर्षांहून अधिकचा काळ झाला असला तरी बोगस जात प्रमाणपत्रामुळे त्याला नोकरी गमवावी लागेल, त्याचबरोबर त्याच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनंही बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणा-याचं जात प्रमाणपत्र रद्द केलं जाईल, असंही सांगितलं होतं.
आणखी वाचा
(बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना वय उलटूनही नोकरी नाही)
(आपला इण्टरव्ह्यू फसला, नोकरी गेली हातची हे कसं ओळखाल?)