यंदाही दुष्काळाचेच ढग, अपुऱ्या मान्सूनची शक्यता
By Admin | Updated: June 2, 2015 23:37 IST2015-06-02T23:37:58+5:302015-06-02T23:37:58+5:30
तीव्र उन्हाच्या झळांनी काहिली वाढली असताना लवकर पाऊस पडण्याची आस लावून बसलेल्यांना लवकर बरसणारा मान्सून दिलासा देऊ शकतो

यंदाही दुष्काळाचेच ढग, अपुऱ्या मान्सूनची शक्यता
नवी दिल्ली : तीव्र उन्हाच्या झळांनी काहिली वाढली असताना लवकर पाऊस पडण्याची आस लावून बसलेल्यांना लवकर बरसणारा मान्सून दिलासा देऊ शकतो, मात्र पाऊस सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान खात्याने वर्तवलेला सुधारित अंदाज आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवू शकतो. यावर्षी ‘अपुऱ्या’ (डिफिशियन्ट) पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याचे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.
हवामान खात्याने यापूर्वी दीर्घकालीन सरासरीच्या आधारे (एलपीए) ९३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सुधारित अंदाजानुसार ही आकडेवारी ८८ टक्क्यांपर्यंत राहणार असल्यामुळे दुष्काळाचे सावट घोंगावू लागले आहे. वायव्य भारताला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. एप्रिलमध्ये हवामान खात्याने (आयएमडी) सामान्यापेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. आता ही सरासरी ८८ टक्क्यांवर आल्यामुळे अपुऱ्या मान्सूनच्या श्रेणीत मोडली गेली आहे.
दरम्यान, सुधारीत हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी राज्यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहे.
मान्सूनला आधीच विलंब झाला असून ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. खरीप पिके नैऋत्य मान्सूनवर अवलंबून असतात. अपुऱ्या पावसाचा परिणाम भातरोवणीवर व तांदळाच्या उत्पादनावर होतो. देशाची ६० टक्के लोकसंख्या शेतीसंबंधी रोजगारावर निर्भर असून देशातील केवळ ४० टक्के शेती सिंचनाखाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)